Tuesday, 13 October 2026
Latest News

ऐरोलीत मध्यरात्री गोळीबाराने हादरली! तरुणाच्या मानेवर गोळी; हल्लेखोर अद्याप फरार..

लेखक: aniketpatil1888 April 7, 2026 1 min read 0 कमेंट्स

Navi Mumbai Airoli News: नवी मुंबईतील ऐरोली परिसरात सोमवारी (6 एप्रिल 2026) मध्यरात्री धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. ऐरोली सेक्टर 1 मधील छत्रपती शिवाजी रहिवाशी चाळ परिसरात एका अज्ञात इसमाने अचानक गोळीबार करत अमित मौर्य यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रबाळे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

ऐरोलीत मध्यरात्री गोळीबाराने खळबळ_ तरुणाच्या मानेवर गोळी; हल्लेखोर अद्याप फरार

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 11:50 वाजता अमित मौर्य आणि त्यांचा मित्र संदीप गवस हे ऐरोली सेक्टर 1 परिसरात उभे होते. त्याच वेळी एका मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. हल्लेखोराने सुमारे चार राऊंड फायरिंग केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून त्यापैकी एक गोळी अमित मौर्य यांच्या मानेत लागली, त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

घटनेनंतर जखमी अमित मौर्य यांना तातडीने ऐरोली येथील इंद्रावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात लव्ह जिहाद व अवैध धर्मांतरण विरोधी कायदा- पहिला ड्राफ्ट तयार

घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित इसम मोटारसायकलवरून येऊन गोळीबार करताना स्पष्टपणे दिसून आला आहे, त्यामुळे तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला आहे.

दरम्यान, या प्रकरणी रबाळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. जखमी अमित मौर्य यांनी अद्याप कोणावरही संशय व्यक्त केलेला नसल्याने या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मध्यरात्री झालेल्या या गोळीबारामुळे ऐरोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *