कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; वीजवाहिनीला स्पर्श होताच घडला प्रकार
कोल्हापुरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. वाय. पी. पोवार नगर मंडळाची तब्बल 21 फुटी गणेशमूर्ती गोखले कॉलेज चौकात अचानक कोसळली. मिरवणुकीदरम्यान मूर्तीचा मार्गावरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यानंतर काही क्षणांतच तिचा तोल गेला आणि मूर्ती रस्त्यावर कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही.

गोखले कॉलेज चौकात अचानक कोसळली मूर्ती
शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 10.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वाय. पी. पोवार नगर मंडळाची गणेशमूर्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून विसर्जनासाठी नेण्यात येत होती. गोखले कॉलेज चौकात मिरवणूक पोहोचली असताना मूर्तीचा रस्त्यावरील विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. त्यानंतर मूर्तीचा समतोल बिघडला आणि ती अचानक रस्त्यावर कोसळली.
21 फुटांची ‘करवीरचा राजा’ मूर्ती
वाय. पी. पोवार नगर मंडळाने यंदा सुमारे 21 फूट उंचीची ‘करवीरचा राजा’ नावाची बॅलेंसिंग गणेशमूर्ती साकारली होती. ही मूर्ती एका पायावर उभी आणि पुढील बाजूला काहीशी झुकलेली होती. त्यामुळे मिरवणुकीदरम्यान मोठ्या काळजीने ती पुढे नेण्यात येत होती. मात्र गोखले कॉलेज चौकात विद्युत तारेला स्पर्श झाल्यानंतर काही क्षणांतच दुर्घटना घडली. महाकाय मूर्ती अचानक रस्त्यावर कोसळल्याने मिरवणुकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मंडळाचे कार्यकर्ते आणि उपस्थित गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. गर्दी नियंत्रणात आणल्यानंतर क्रेनच्या मदतीने मूर्ती रस्त्यावरून बाजूला करण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेनंतर विसर्जन मार्गावरील विद्युत तारांच्या व्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मार्गातील विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्या हटवण्याबाबत आधीच संबंधित यंत्रणेकडे विनंती केली होती, मात्र त्याची आवश्यक पूर्तता झाली नसल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे महावितरणने हा दावा फेटाळला असून मिरवणुकीच्या सुरुवातीपासूनच आपली टीम मूर्तीसोबत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दुर्घटनेची नेमकी कारणमीमांसा आणि जबाबदारीबाबत दोन्ही बाजूंचे दावे वेगळे आहेत. 21 फुटांची मोठी मूर्ती अचानक कोसळल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकली असती. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिस, अग्निशमन दल आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान उंच मूर्ती नेताना विद्युत तारा, झाडांच्या फांद्या आणि रस्त्यावरील इतर अडथळ्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा समोर आली आहे.
