एका फटक्यात मॅचचा मूड बदलला! वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज खेळी
IND vs ZIM U19 World Cup: अंडर-19 विश्वचषक 2026 मध्ये सुपर सिक्स टप्प्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेविरोधात दमदार सुरुवात केली. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या फटकेबाजीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि भारताचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी व एरॉन जॉर्ज मैदानात उतरले.

दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. एरॉन जॉर्ज 23 धावा करून बाद झाला, मात्र दुसऱ्या टोकाला वैभव सूर्यवंशी ठामपणे उभा होता. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक खेळ करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर दबाव आणायला सुरुवात केली. चौकार-षटकारांच्या जोरावर त्याने धावांचा वेग वाढवला आणि सामन्याची दिशा बदलली.
सामन्याच्या पाचव्या षटकात मैदानावर चांगलाच तणाव पाहायला मिळाला. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी वैभववर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. वेगवान गोलंदाज पनाशे मजाईकडून टशन दाखवण्याचा प्रकार झाला, मात्र त्याच क्षणी वैभवने आपल्या बॅटने उत्तर दिलं. मजाईच्या पाचव्या चेंडूवर वैभवने असा उत्तुंग षटकार ठोकला की चेंडू थेट मैदानाबाहेर जाऊन पडला. काही वेळ चेंडू शोधावा लागला, इतका तो फटका प्रचंड होता.
IND vs NZ 1st ODI: हर्षित राणाच्या दमावर भारताचा विजय, मालिकेत 1-0 आघाडी
त्या षटकारानंतरही पनाशे मजाई वैभवला चिथावण्याचा प्रयत्न करत राहिला. मात्र वैभवने संयम न सोडता पुढच्या षटकातच त्याची मस्ती पूर्णपणे उतरवली. मजाईच्या पुढील षटकात वैभवने सलग दोन षटकार आणि एक चौकार ठोकत एकाच षटकात 18 धावा काढल्या. या फटकेबाजीमुळे झिम्बाब्वेचा गोलंदाजी मारा पूर्णपणे कोलमडून पडला.
झिम्बाब्वेविरोधात वैभव सूर्यवंशीची बॅट अक्षरशः तळपली. त्याने केवळ 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 30 चेंडूत 52 धावा करून तो बाद झाला. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. काही काळासाठी तो शतक झळकावेल असे वाटत होते, मात्र मोठी खेळी करण्याआधीच त्याचा डाव संपला.
दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याला मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तो 21 धावांवर बाद झाला. सातत्याने चांगली सुरुवात करून मोठी खेळी न करता बाद होण्याची त्याची मालिका चिंतेची बाब ठरत आहे. क्रिकेट चाहत्यांच्या मते, आयुषने लवकरच सूर गवसला तर तो आणि वैभव सूर्यवंशी मिळून अंडर-19 विश्वचषकात नवा इतिहास रचू शकतात.
