Tuesday, 13 October 2026
राजकारण

Balasaheb Thackeray 100th Birth Anniversary : मराठी माणूस खचलेला नसावा – राज ठाकरेंची काळजाला भिडणारी पोस्ट, दिला मोठा शब्द

लेखक: aniketpatil1888 January 23, 2026 1 min read 0 कमेंट्स

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आज १०० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात अभिवादनाचा सूर उमटत आहे. दादर येथील शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी पोस्ट शेअर केली असून ती सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून बाळासाहेबांचा कालातीत प्रभाव, आजच्या राजकारणातील बदललेली मूल्यव्यवस्था आणि मराठी माणसाच्या अस्मितेबाबत ठाम भूमिका मांडली आहे. “बाळासाहेब केवळ त्यांच्या शताब्दीतच नव्हे, तर द्विशतकी जन्मवर्षातही लोकांच्या स्मरणात राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

जुना फोटो, आठवणींना उजाळा

राज ठाकरे यांनी ट्विटर (X) वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि स्वतःचा एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे बाळासाहेबांची शाल हातात धरून व्यासपीठावर उभे असल्याचे दिसतात. या छायाचित्रासोबत दिलेल्या कॅप्शनमधून त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांची खोली मांडली आहे.

निष्ठा विकल्या जातात, पण बाळासाहेबांचा वारसा अमर आहे”

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की,
आजच्या राजकारणात निष्ठा सहज विकल्या जातात, तत्वांना फारसं महत्त्व उरलेलं नाही आणि यशाची मोजदाद ही केवळ निवडणूक जिंकण्यापुरती मर्यादित झाली आहे. मात्र बाळासाहेबांच्या काळात सत्ता हे अंतिम ध्येय नव्हतं, तर सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून देणं हाच केंद्रबिंदू होता.

“सत्ता येते- जाते, पण काही व्यक्तींचा प्रभाव पिढ्यान्‌पिढ्या टिकतो. बाळासाहेबांची ताकद हीच होती आणि हाच त्यांचा खरा वारसा आहे,” असे ठाम शब्द त्यांनी वापरले आहेत.

मराठी माणसाला दिला मोठा शब्द

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून मराठी माणसाला स्पष्ट शब्द दिला आहे.
राजकारणात कधीकधी लवचिक भूमिका घ्यावी लागली, तरी ती कधीही वैयक्तिक स्वार्थासाठी नसेल, असे त्यांनी ठामपणे नमूद केले आहे. बाळासाहेबांनी मराठी भाषा, मराठी प्रांत आणि मराठी माणसासाठी उभा केलेला लढा पुढेही तितक्याच ताकदीने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोठी बातमी! हिंदू-मुस्लिम जमीन खरेदीवर नवा नियम? ‘तो निर्णय’ नेमका काय आहे, देशभर लागू होणार का?

“‘बाळासाहेब’ आणि ‘मराठी’ या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा कधीही कमी होणार नाही,” असे भावनिक विधान करत त्यांनी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन केले आहे.

पोस्ट व्हायरल, राजकीय वर्तुळात चर्चा

दरम्यान, राज ठाकरे यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सध्याच्या राजकारणात मूल्यांची आठवण करून देणारी ही पोस्ट अनेकांच्या काळजाला भिडताना दिसत आहे.

तुमचा प्रतिसाद द्या

Your email address will not be published. Required fields are marked *