मुंबई महानगरपालिकेच्या ७८ व्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने अनुभवी आणि आक्रमक नेत्या रितू राजेश तावडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अधिकृत घोषणा करत ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रितू तावडे या महायुतीच्या उमेदवार असतील, असे स्पष्ट केले.

महापौरपद हे यंदा ‘सर्वसाधारण प्रवर्ग महिला’ या गटासाठी आरक्षित झाल्याने भाजपने एका अभ्यासू, संघर्षशील आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट रस्त्यावर उतरणाऱ्या नेत्या पुढे केल्या आहेत.
रितू तावडे कोण आहेत?
घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून रितू तावडे या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. ५३ वर्षीय रितू तावडे यांची ओळख भाजपमधील अभ्यासू, स्पष्टवक्त्या आणि आक्रमक नेत्या म्हणून आहे. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून काम करताना शालेय शिक्षण व्यवस्थेत अनेक सुधारणा घडवून आणल्या. डिजिटल शिक्षण, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर त्यांनी विशेष भर दिला होता.
मराठा चेहरा, गुजराती बहुल मतदारसंघात मजबूत पकड
रितू तावडे या मराठा समाजातील नेत्या असल्या, तरी त्यांचा मतदारसंघ गुजराती बहुल आहे. या मतदारसंघात सातत्याने विजय मिळवत त्यांनी सर्व समाजघटकांमध्ये आपली विश्वासार्हता निर्माण केली आहे.यामुळेच भाजपने त्यांना मराठी + गुजराती मतदारांना जोडणारा चेहरा म्हणून पुढे केले आहे.
भाजप महिला मोर्चातील प्रभावी नेतृत्व
रितू तावडे यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष, ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष,सध्या मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. पक्ष संघटनेत त्यांचा अनुभव भाजपसाठी महत्त्वाचा मानला जातो.
गाजलेली आंदोलने आणि सामाजिक कार्य
रितू तावडे यांची ओळख केवळ नगरसेविका म्हणून नाही, तर जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्या म्हणून आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या अश्लील जाहिराती आणि पुतळ्यांविरोधातील त्यांच्या आंदोलनाची दखल थेट BBC London ने घेतली होती. या आंदोलनानंतर अशा जाहिरातींवर बंदी घालण्यात आली.
महिला व विद्यार्थिनी सुरक्षा
पालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी त्यांनी POCSO कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनावर दबाव टाकला.
पाणी माफियांविरुद्ध निर्णायक लढा
घाटकोपरमधील पाणी टंचाईविरोधात त्यांनी काढलेला ‘हंडा मोर्चा’ राज्यभर चर्चेचा विषय ठरला. या आंदोलनानंतर पाणी चोरांविरोधात मोठी कारवाई झाली.
हेही वाचा: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर 32 तास कोंडी, टोल परत द्या – राज ठाकरेंची सरकारवर थेट मागणी
महिला सक्षमीकरण
‘मराठा प्रतिष्ठा’ संस्थेच्या अध्यक्षा म्हणून तसेच MAVIM च्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी
१८ एप्रिल १९७३ रोजी जन्मलेल्या रितू तावडे यांचे शिक्षण एस.वाय.बी.कॉम पर्यंत झाले आहे. त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत. स्वतः रितू तावडे या मे. आर. आर. इंटरप्राईजेस या व्यवसायाच्या प्रोप्रायटर आहेत.
भाजपचा राजकीय मास्टरस्ट्रोक?
मुंबईत भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मराठा समाजातील असूनही गुजराती बहुल मतदारसंघात विजय मिळवणाऱ्या रितू तावडे या भाजपसाठी स्ट्रॅटेजिक निवड ठरल्या आहेत. हायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने, रितू तावडे मुंबईच्या पुढील ‘प्रथम नागरिक’ ठरणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

