११वा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 28 जानेवारीपासून; 5 दिवसांत जगभरातील 70 सिनेमांचा महापर्व
मराठी प्रेक्षकांना जागतिक दर्जाच्या सिनेमांचा अनुभव देणारा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (AIFF) यंदा अकराव्या वर्षात पदार्पण करत आहे. हा बहुप्रतिक्षित महोत्सव बुधवार, 28 जानेवारी ते रविवार, 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या पाच दिवसांत जगभरातील तब्बल 70 निवडक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.

नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या सहकार्याने आणि मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन यांच्या आयोजनाखाली हा महोत्सव होत असून, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयासह महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे पाठबळ या उपक्रमाला लाभले आहे. एनएफडीसी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांचीही सहप्रस्तुती असणार आहे.
महोत्सवामागचा हेतू काय?
जगातील सर्वोत्तम चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचावेत, नवोदित व अनुभवी दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच मराठवाडा हा सिनेमा निर्मितीच्या दृष्टीने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे उभा राहावा, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. छत्रपती संभाजीनगर हे शहर सांस्कृतिक केंद्रासह भविष्यातील फिल्म प्रोडक्शन हब म्हणून ओळखले जावे, ही या उपक्रमामागची भूमिका आहे.
भारतीय सिनेमा स्पर्धा – सुवर्ण कैलासचे आकर्षण
महोत्सवात यंदाही भारतीय सिनेमा स्पर्धा विभाग असणार आहे. विविध भारतीय भाषांमधील 9 निवडक चित्रपट या गटात दाखल करण्यात आले असून, राष्ट्रीय स्तरावरील पाच सदस्यीय ज्युरी हे चित्रपट प्रेक्षकांसह पाहणार आहेत.
- सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला ‘सुवर्ण कैलास’ पुरस्कार आणि ₹1 लाख रोख रक्कम देण्यात येणार आहे.
- याशिवाय सर्वोत्तम पटकथा, सर्वोत्तम अभिनेता व अभिनेत्री अशी वैयक्तिक पारितोषिकेही जाहीर केली जाणार आहेत.
या ज्युरी समितीचे अध्यक्ष म्हणून ऑस्कर विजेते ध्वनी संयोजक पद्मश्री रसूल पुक्कूट्टी काम पाहणार असून, त्यांच्या सोबत अनिरुद्ध रॉय चौधरी, आरती बजाज, राफे मेहमूद आणि उर्मी जुवेकर हे मान्यवर परीक्षक असतील.
फिप्रेस्की विभागात नव्या दिग्दर्शकांवर लक्ष
आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षकांची संघटना FIPRESCI यंदाही महोत्सवात सक्रिय सहभाग घेणार आहे. नव्या पिढीतील दिग्दर्शकांचे पहिले किंवा दुसरे चित्रपट या विभागात विशेष परीक्षणासाठी निवडले जाणार आहेत. या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. सी. एस. व्यंकटीश्वरन असतील.
उद्घाटन सोहळा आणि उद्घाटकीय चित्रपट
महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा 28 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता एमजीएम परिसरातील रूक्मिणी सभागृहात होणार आहे. या सोहळ्याला प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि ऑस्कर विजेते रसूल पुक्कूट्टी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
हे वाचा: The RajaSaab Movie Review in Marathi: कसा आहे प्रभास आणि संजय दत्तचा
उद्घाटनानंतर रात्री 9 वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे स्पॅनिश-फ्रेंच भाषेतील, ऑस्कर शर्यतीत चर्चेत असलेला ऑलिव्हर लॅक्से दिग्दर्शित ‘Sirat’ हा चित्रपट उद्घाटकीय सिनेमा म्हणून दाखवला जाणार आहे.
मास्टरक्लास, परिसंवाद आणि थेट संवाद
महोत्सवात केवळ चित्रपट प्रदर्शनच नव्हे तर संवाद, मास्टरक्लास आणि परिसंवादांची मेजवानी देखील असणार आहे.
- दिग्दर्शक चिदंबरम,
- ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर,
- निर्माते-दिग्दर्शक आनंद एल. राय,
- तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते तज्ज्ञ विविध विषयांवर थेट संवाद साधणार आहेत.
मराठी सिनेमाचा बदलता चेहरा, संहिता ते पडदा यांसारख्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत.
मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा आणि कार्यशाळा
मराठवाड्यातील नवोदित दिग्दर्शकांसाठी आयोजित शॉर्ट फिल्म स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अंतिम फेरीतील 5 लघुपट महोत्सवात प्रदर्शित केले जाणार असून, विजेत्या चित्रपटाला ₹25,000 रोख पारितोषिक दिले जाणार आहे.
याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी चित्रपट रसग्रहण कार्यशाळा 13 ते 27 जानेवारी दरम्यान शहरातील विविध महाविद्यालयांत घेतल्या जाणार आहेत.
प्रतिनिधी नोंदणी सुरू
चित्रपट रसिकांसाठी ऑनलाईन प्रतिनिधी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी www.aifilmfest.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.
