महाराष्ट्रात २० पदांसाठी भरती! मुंबईत ३ आणि ४ नोव्हेंबरला थेट मुलाखती
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM), राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र मुंबई कार्यालयांतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीमध्ये एकूण २० पदांचा समावेश असल्याची माहिती भरती जाहिरातीतून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी ऑनलाइन अर्जाऐवजी थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
या भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे. तांत्रिक विभागात डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आयटी आणि डिजिटल हेल्थशी संबंधित पदांचा समावेश आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील पदवीसोबत अनेक वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे. त्यामुळे आयटी, संगणक, सॉफ्टवेअर आणि आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी ही संधी महत्त्वाची ठरू शकते.
मुलाखती कधी आणि कुठे होणार?
अधिकृत जाहिरातीनुसार तांत्रिक पदांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी, तर अतांत्रिक पदांसाठी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीसाठी उमेदवारांनी मुंबईतील राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र, आरोग्य भवन, आठवा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल परिसर, सीएसएमटी रेल्वे स्टेशनजवळ, मुंबई – ४००००१ येथे उपस्थित राहायचे आहे.
झोमॅटोमध्ये डिलिव्हरी पार्टनर कसे बनायचे? पात्रता, कागदपत्रे आणि कमाई जाणून घ्या
अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया नसून मुलाखतीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज सादर करायचा आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीतील अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती, मूळ प्रमाणपत्रे आणि जाहिरातीत नमूद केलेला डिमांड ड्राफ्ट सोबत ठेवावा. पदानुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, मानधन आणि इतर अटी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे मुलाखतीला जाण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अधिकृत जाहिरात आणि पदनिहाय पात्रतेची माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे.
