उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत अजित पवारांनी थेट निशाणा साधल्यानंतर आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

बावनकुळे म्हणाले की, महायुतीच्या समन्वय समितीत मित्रपक्षांमध्ये निवडणूक लढत असली तरी वैयक्तिक आरोप टाळायचे असा स्पष्ट निर्णय झाला होता. “मी स्वतः त्या समितीचा सदस्य आहे. आम्ही त्या निर्णयाचं पालन केलं, मात्र अजित पवारांनी ते पाळलं नाही,” असं त्यांनी सांगितलं.
अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “अजित दादा हे राज्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी काय बोलावं यावर मी सल्ला देण्याच्या भूमिकेत नाही. पण पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक वर्ष ते स्वतःही सत्तेत होते. जर मागची पानं उलटली, तर अनेक गोष्टी बोलणं कठीण होईल.
हेही वाचा: पुणेकरांसाठी मोठी घोषणा! फडणवीसांचा 44 हजार कोटींचा मास्टर प्लॅन जाहीर…
तसंच त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितलं की, 70 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजून कोणताही अंतिम न्यायालयीन निकाल लागलेला नाही. “कोर्टात प्रकरण सुरू आहे. निकाल येईपर्यंत अशा आरोपांवर बोलणं योग्य नाही. छोट्या निवडणुकीसाठी महायुतीत मतभेद निर्माण करणं कुणाच्याही हिताचं नाही,” असं बावनकुळे म्हणाले.
शेवटी बोलताना त्यांनी सूचक शब्दांत सांगितलं की, “बोलण्यासारखं खूप काही आहे, पण आज तो दिवस नाही.” या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा चर्चेत आला आहे.
