Jan Aakrosh Morcha Navi Mumbai: कल्याण शिळफाटा येथे मंदिरात गेलेल्या अक्षता म्हात्रे या विवाहितेवर तीन पुजाऱ्यांनी शारीरिक अत्याचार करून निर्दयीपणे हत्या केली. कोपरखैरणे तीन टाकी ते वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मोर्चा काढला होता त्यामध्ये महिलांसह पुरुष व राजकीय नेते सुध्दा मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
नवी मुंबई : बेलापूर येथील सासर आणि कोपरखैरणे येथे माहेर असणाऱ्या या दुर्दैवी महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी आज हा मोर्चा काढण्यात आला आहे. अक्षता म्हात्रे हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांसह ग्रामस्थांनी रविवारी ‘जन आक्रोश’ मोर्चा काढला होता.
नराधमांना नुसते ताब्यात न ठेवता फासावर लटकवून कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे येथून वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे ‘जन आक्रोश’ मोर्चा निघाला आहे. या मोर्चात नवी मुंबईतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आणि आरोपीला कठोर शिक्षा करून फाशीची द्या अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी संपूर्ण मोर्चात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
यावेळी ‘जस्टिस फॉर अक्षता’च्या घोषणा देण्यात आल्या. काळया फिती लावून या घटनेचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांनी, समाजातील प्रतिनिधींनी अक्षता म्हात्रे हिला श्रद्धांजली अर्पण केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेविरोधात प्रचंड आक्रोश, संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मारेकऱ्यांना फाशीची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.
या ‘जन आक्रोश’ मोर्चामध्ये माजी मंत्री व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्यासह शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी खासदार राजन विचारे, डॉ.संजीव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, नामदेव भगत (राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष), युवक युवती. मोर्चात काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, मनसे गजानन काळे, अनिल कौशिक (जिल्हा अध्यक्ष काँग्रेस), माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे-शिंदे गटाचे पदाधिकारी, व ग्रामस्थ सहभागी झाले होते.