Arjuna Ranatunga Arrest in Sri Lanka: १९९६ चा विश्वचषक जिंकणारे श्रीलंकेचे कर्णधार अर्जुन रणतुंगा लवकरच तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. त्यांचे भाऊ दम्मिका यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. अटकेचे कारण म्हणून पोलिसांनी काय सांगितले, ते जाणून घ्या.

मुंबई: क्रिकेटच्या जगात एक मोठी बातमी आहे. १९९६ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवून देणारे अर्जुन रणतुंगा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून ते लवकरच तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. हे आरोप त्यांच्या पेट्रोलियम मंत्रीपदाच्या कार्यकाळातील आहेत. या प्रकरणात त्यांचे मोठे भाऊ दम्मिका रणतुंगा यांनाही दोषी आढळले आहे. पोलिसांनी दम्मिका यांना अटक केली होती, परंतु नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. अर्जुन रणतुंगा यांचे मोठे भाऊ दम्मिका रणतुंगा यांना सध्या देश सोडून जाण्याची परवानगी नाही. दम्मिका हे श्रीलंका आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नागरिक आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ मार्च २०२६ रोजी होणार आहे.
भ्रष्टाचार चौकशी आयोगाने सांगितले की, ६३ वर्षीय दम्मिका यांना २०१७ मध्ये सरकारी संस्था सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने कच्च्या तेलाच्या खरेदीच्या पद्धतीतील अनियमिततेमुळे अटक करण्यात आली होती. त्यांच्या कृतीमुळे सीपीसीचे ८० कोटी श्रीलंकन रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या भ्रष्टाचार आयोगाने कोलंबो येथील न्यायाधीशांना सांगितले की, अर्जुन रणतुंगा हे दुसरे आरोपी आहेत आणि ते सध्या देशात नाहीत. ते परत आल्यावर त्यांना ताब्यात घेतले जाईल.
हेही वाचा: ट्रम्प यांच्या धक्कादायक भूमिकेमुळे अमेरिकेतील भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती
श्रीलंकेचे नवीन सरकार भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अनुरा कुमारा दिसानायके यांच्या सरकारने २०२४ मध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची प्रतिज्ञा केली होती. ही नवीन सरकारच्या चौकशी प्रक्रियेचाच एक भाग आहे. अर्जुन रणतुंगा यांचे भाऊ प्रसन्ना रणतुंगा यांनाही विमा फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. प्रसन्ना हे श्रीलंकेचे पर्यटन मंत्री होते. त्यांचे प्रकरण २०२२ सालचे आहे.
अर्जुन रणतुंगा हे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे एक यशस्वी कर्णधार राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने १९९६ मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्याने २९३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि ९३ कसोटी सामने खेळले असून, १०,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तो कर्णधार असतानाच श्रीलंकेने इंग्लंडमध्ये आपली पहिली कसोटी मालिका जिंकली.
